नवी दिल्ली : जंतर मंतर येथे परवानगीशिवाय प्रवेश करत तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी करणार्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.
नवी दिल्लीतील जंतर मंतर या आंदोलनासाठी बंदी घातलेल्या मैदानात परवानगीशिवाय घुसून घोषणाबाजी करणार्या ङ्गकॉक्रोच जनता पार्टीफ या संघटनेच्या तीन प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे अशी या तीन नेत्यांची नावे असून, त्यांना आज मंदिर मार्ग येथील विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
राहुल गांधी म्हणाले, जंतर मंतर येथे शांततेत आंदोलन करताना तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही. पण तरुणांना तुरुंगात डांबणं हा भ्याडपणा आहे. तरुण, विद्यार्थी, पत्रकार, इंडिया आघाडी. हे विविध बॅनर असले तरीही त्यांच्या आंदोलनाचं कारण एकच आहे. सर्व आंदोलक एक आहेत. नागरिक त्यांचे मुलभूत अधिकार मागत आहेत. जंतर मंतर हे भारतीय नागरिकांचं आहे.
अभिजीत दिपके यांची टीका
अभिजीत दिपके यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या घटनेचा तीव्र निषेध केला. जंतरमंतरवर राष्ट्रध्वज फडकवणे हा काय गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. आशु आणि सौरव यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा अपराध काय? तर जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे! नरेंद्र मोदीजी, थोडी हिंमत दाखवा. जर विरोध आणि असंतोष दडपून टाकायचाच असेल, तर अशा भ्याड कारवायांचा आश्रय घेण्यापेक्षा अधिकृतपणे आणीबाणी जाहीर करण्याचे धाडस दाखवा, असं अभिजीत दिपके म्हणाले.